रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावरील निवळी कोकजेवठार–सुतारवाडी घाटात शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6.45 वाजता भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेला कंटेनर नियंत्रण सुटल्यामुळे उलटला आणि या अपघातात चालकाचा मृत्यू झाला.
मृत चालकाची ओळख सुभाष जगतपाल वर्मा (वय 23, रा. बंडा, खुटार, छतरपूर, प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी झाली आहे. तो कंटेनर (MH 46 BB 1537) मधून ऑक्सिजन व हिलियम गॅस घेऊन जयगड ते मुंबई या मार्गावर जात होता. मात्र निवळी बावनदी–सुतारवाडी उतारातील वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर उलटला.
गंभीर जखमी अवस्थेत सुभाष वर्मा याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून कंटेनर बाजूला हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
या अपघाताबाबत पोलिस पाटील संजना संजय पवार (वय 41, रा. निवळी कोकजेवठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

