मुंबई : मुलांच्या ताब्याबाबत महत्वाचा निकाल देताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आजीला नातवाचा ताबा ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. पालकांच्या अनुपस्थितीत किंवा विशेष परिस्थितीतच न्यायालयाच्या आदेशाने आजी-आजोबा नातवाचा ताबा घेऊ शकतात, मात्र कायद्यानुसार मुलांच्या पालकांनाच हा अधिकार असतो.
न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे कुटुंबातील पालकत्वाशी संबंधित प्रकरणांमध्ये स्पष्टता आली आहे. न्यायालयाने सांगितले की, मुलांच्या कल्याणाचा विचार करूनच पालकत्वाचा ताबा ठरवला जातो आणि नातवंडांवर आजी-आजोबांचे प्रेम महत्त्वाचे असले तरी त्यांना आपोआप कायदेशीर ताबा मिळत नाही.
आजी-आजोबांचे नातवंडांशी भावनिक नाते असते, परंतु कायद्याच्या दृष्टीने मुलांच्या ताब्याचा अधिकार पालकांच्याच नावावर असतो, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
७४ वर्षीय एका वृद्ध महिलेने आपल्या पाच वर्षीय नातवाचा ताबा ठेवण्याचा आग्रह धरला होता. मात्र, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा आग्रह फेटाळून लावला आणि नातवाचा ताबा त्याच्या पालकांना परत देण्याचे आदेश दिले.
ही कारवाई मालमत्तेवरील वादातून उभी राहिली होती. वृद्ध महिलेचा मुलाशी वाद सुरू झाल्यानंतर त्याने आपल्या मुलाचा (नातवाचा) ताबा परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीनंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, भावनिक नाते हे कायदेशीर अधिकार ठरत नाही. मुलाच्या कल्याणासाठी व कायदेशीर हक्कासाठी ताबा आई-वडिलांकडेच राहिला पाहिजे.
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, नातवंडांवर आजी-आजोबांचे प्रेम महत्त्वाचे असले तरी त्यामुळे त्यांना पालकांपेक्षा अधिक अधिकार मिळत नाहीत. या प्रकरणात मुलाच्या जुळ्या भावाला सेरेब्रल पाल्सीचा आजार असल्याने पालकांनी एका मुलाला आजीकडे सोपवले होते. पण वाद उभा राहिल्यानंतर न्यायालयाने पालकांच्या हक्काला मान्यता दिली.

