रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू
गणेशोत्सव संपल्यानंतर रत्नागिरीतून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातील एसटी बससेवांवर मोठा ताण आला आहे. मुंबईसाठी एसटी बसेस मोठ्या संख्येने रवाना होत असल्याने जिल्ह्यातील आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत एसटी बसेसचे वेळापत्रक पुन्हा विस्कळीत झाले आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार अनेक गाड्या वेळेवर धावत नाहीत. काही गाड्या उशिरा आल्या तरी त्यामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजेच तब्बल 140 ते 150 प्रवासी कोंबत प्रवास करत आहेत. त्यामुळे गर्दी, गोंधळ, उभे राहून प्रवास आणि सुरक्षिततेचा अभाव या समस्या गंभीर होत आहेत.
एसटी वेळेवर न आल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना भरलेल्या बसमध्ये चढावे लागत आहे. अनेक जण दारात लोंबकळत प्रवास करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. गणेशोत्सव काळात प्रवाशांसाठी वाढीव बसफेऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
रत्नागिरी–लांजा, रत्नागिरी–राजापूर, रत्नागिरी–देवरूख तसेच लांजा, राजापूर, कणवली मार्गावरील एसटी बसेसमध्ये गुरुवारी तुफान गर्दी झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाईलाजास्तव उभे राहून रत्नागिरी गाठावे लागले. या परिस्थितीमुळे चाकरमानी, नोकरदार, व्यापारी आणि सामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.
गणेशोत्सव काळात मुंबईतून चाकरमान्यांना आणण्यासाठी तसेच रत्नागिरी विभागातून मुंबईला सोडण्यासाठी एसटी विभागाने जादा बसेस धावविल्या होत्या. परिणामी बहुतांश गाड्या मुंबईकडे वळल्या. मात्र या काळात जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी तसेच आंतरजिल्हा मार्गांसाठी पुरेशा बसेस राखून ठेवण्याचे नियोजन अपेक्षित होते, ते झाले नाही.
रत्नागिरी विभागातील तब्बल 200 एसटी बसेस मुंबईला गेल्यामुळे कोल्हापूर, विजापूरसह जिल्ह्यातील अनेक गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांना उशीर, गैरसोय आणि वाढीव खर्चाचा सामना करावा लागला. काहींना घरी जाण्यासाठी रिक्षा व वडाप सारख्या महागड्या पर्यायांचा आधार घ्यावा लागला.
सध्या परतीच्या प्रवासातही हीच परिस्थिती उद्भवली असून रत्नागिरी विभागातून तब्बल 2,500 एसटी बसेस मुंबईकडे रवाना झाल्यामुळे 2 सप्टेंबरपासून एसटी बससेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

