चिमुकलीवर चुलत काकाकडून अत्याचार; मंडणगड हादरले, नराधम पोलिसांच्या ताब्यात
जानेवारी १७, २०२६
0
मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने एका दोन वर्षीय चिमुकलीला नेऊन तिच्यावर स्वतःच्या चुलत काकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१७ जानेवारी) घडली. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी संशयित आरोपीला रविवारी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई, वडील आणि सासू हे मंडणगड एसटी स्टँड परिसरात बसले होते. यावेळी पीडित मुलीचा चुलत काका तिथे आला. "मुलीला खाऊ घेऊन देतो," असे सांगून तो तिला सोबत घेऊन गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने कुटुंबाला काळजी वाटू लागली.
असा लागला छडा: मुलीचा शोध घेत असताना कुटुंबीय नगरपंचायतीच्या पाठीमागील देशी दारू दुकानाजवळ पोहोचले. तिथे जवळच असलेल्या एका पडक्या खोलीतून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. कुटुंबीयांनी तत्काळ त्या दिशेने धाव घेतली असता, संशयित नराधम अत्याचार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपल्या कुटुंबाला पाहताच आरोपीने तिथून पळ काढला.
पोलिस कारवाई: या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने तातडीने मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्रे फिरवली आणि रविवारी संशयित आरोपीला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण मंडणगड परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
Tags

